अन्न, पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची भटकंती   

मंचर, (वार्ताहर) : ऐन उन्हाळ्यात अन्न, पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची भटकंती सुरु झाली आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील एस, कॉर्नर येथे बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एक काळ्या रंगाचे उदमांजर शेतकर्‍याच्या गोठ्या जवळ अन्न पाण्याच्या शोधात फिरताना दिसून आले.
 
मंचर एस कॉर्नर गांजाळेमळा येथील भागचंद गांजाळे हे सकाळी सहा वाजता उठले असता त्यांच्या गोठ्याजवळ त्यांना उदमांजर दिसले. त्यांनी उदमांजराला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्या ठिकाणी अर्धा तास घुटमळत होते,  नंतर ते ओढ्याच्या बाजूला झाडाझुडपात निघून गेले. अन्न पाण्याच्या शोधात तसेच गोठ्यात असलेल्या कोंबड्यांच्या आवाजाने ते त्या ठिकाणी आले असावे. असे शेतकरी भागचंद गांजाळे यांनी सांगितले. यापूर्वी ही गांजाळे यांच्या गोठ्यात बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. त्यानंतर आता उदमांजर देखील आले होते. कडक उन्हाळ्यामुळे डोंगर, रानावनातील पानवटे आटले असून, वन्य प्राणी मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधात येत आहेत. वनविभागाने ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. त्या ठिकाणी पाणवटे तयार करून त्यात पाण्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.
 
सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक वन्य प्राणी, पक्षी अन्नपाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. बिबटे, कोल्हे अन्न,पाण्याच्या शोधात दिवसाढवळ्या शेतकर्‍यांना दर्शन देत आहे.पाण्याची उपलब्धता वन विभागाच्या मार्फत होणे गरजेचे आहे.
 
- दत्ताराम वैद, सदस्य पारगाव ग्रामपंचायत.
 

Related Articles